आहे त्या पालकाकडेच मुलगा राहणार

The child will remain with the guardian

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – संसारात निर्माण झालेल्या वादातून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात पोहोचलेल्या पती-पत्नीच्या प्रलंबित दाव्यात उन्हाळी सुट्टीसाठी मुलाच्या ताब्यासाठी दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात अर्ज करण्यात येतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनंतर या दाव्यात सुनावणी होणार आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहात ज्या पालकांकडे मुलगा आहे. त्या पालकाकडेच ठेवण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. नुकताच एका नामांकित बॅंकेत कामाला असलेला अधिकारी आणि परराज्यात कंपनीत मोठ्या हुद्यावर असलेल्या पत्नीने असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा मुलांच्या ताब्यासाठी कमी अर्ज येण्याची शक्‍यता आहे.

घटस्फोटाने आई-वडिलांचे नाते संपुष्टात येते. त्यावेळी मुलांच्या ताबा कुणाकडे असेल, दुसरा पालक त्याला कधी भेटेल, याबाबत कौटुंबिक न्यायालय ठरवत असाते. मात्र, घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर बऱ्याचदा दोघे वेगळे राहत असतात. एका पालकाकडेच पाल्याचा ताबा असतो. त्याला भेटण्यासाठी दुसरा पाल्य अर्ज करत असतो. मुलालाही विखुरलेल्या आई-बाबांच्या भेटीसाठी उन्हाळी सुट्टी कारणीभुत ठरत असते. वास्तविक, मुलाला आई-वडिल दोघांचेही प्रेम हवे असते. त्याला आई-वडील एकत्र हवे असतात; परंतु या कौटुंबिक वादात त्यांचे बालपण हिरावले जाते.

मुलाचा ताबा देताना न्यायालयाला विविध बाबी विचारात घ्याव्या लागतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा काय आहेत हे पाहताना मुलांचे वय, लिंग, त्याला काही शारीरिक, मानसिक व्यंग आहे का हे पाहावे लागते. मुलांचा ताबा एका पालकाकडून दुसऱ्या पालकाकडे देतेवेळी मुलांच्या मनावर या बदलाचा काय परिणाम होईल हादेखील विचार करावा लागतो. आई गावी आहे, जिथे शिक्षणाची सोय नाही, वडील मुलांच्या शिक्षणाची आणि सांभाळण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, तेव्हा ताबा देण्याचा कल वडिलांकडे झुकू शकतो. जर मूल मानसिकरीत्या कमकुवत आहे, त्याला मानसिक व्यंग आहे, अशा वेळी आई मुलाला जास्त चांगल्या प्रकारे सांभाळू शकण्याचा संभव असतो.

ताबा देताना मुलांना काही नुकसान तर होणार नाही ना याचा विचार करावा लागतो. मुलाची पूर्ण वाढ कोणाकडे जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकते याचा अभ्यास केला जातो. आई-वडिलांपासून वाताहत झालेल्या मुलांच्या ताब्यासाठी उन्हाळी सुट्टी महत्त्वाची ठरते. वर्षभर एका पालकाकडे राहिलेल्या मुलाने उन्हाळी सुट्टीचे दिवस सोबत घालवावेत, अशी अशी पालकांची इच्छा असते. त्यासाठी अशा पालकांची धाव पुन्हा कौटुंबिक न्यायालयाकडे जाते. मात्र, यंदा करोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन पुकारला आहे. त्यानंतर ताब्याच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

सध्याच्या परिस्थितीमुळे ज्या पालकाकडे मुलगा आहे. तिकडे ठेवण्यास पसंती देण्यात येत आहे. याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणेच्या सचिव ॲड. सुनिता जंगम म्हणाल्या, करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मुलाचा ताबा घेण्यासाठी अर्ज करणारे दुसऱ्या शहरातील असू शकतात. तर, काही एकाच शहरात असू शकतात. परंतु, संसर्गाचा विचार करत सध्या ज्या पालकांकडे मुलगा आहे. त्या पालकाकडे ठेवण्यात अनेक पालकांमध्ये एकमत होत आहे. अर्ज करण्यापूर्वी जोडप्यांनी याचा विचार करावा. आहे तिथे पाल्याला सुरक्षित राहु द्यावे. ज्या पालकाकडे मुलगा आहे. त्या पालकाने व्हिडीओ कॉलद्वारे दुसऱ्या पालकाला भेटण्यास परवागनी द्यावी. जेणेकरून दुसरा पालकही आनंदी राहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.