पळसगाव येथे सराव करताना घटना, संशयितास अटक
सातारा – पिस्टल चालवण्याचा सराव करत असताना युवकाकडून त्याचीच आई जखमी झाल्याची घटना खटाव तालुक्यातील पळसगाव येथे घडली. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित अभिषेक गुलाब फडतरे (रा. पळसगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी की पळसगाव येथील अभिषेक उच्चशिक्षीत असून तो सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. पळसगाव येथे त्याचे चुलते व त्याच्या कुटुंबीयांचा जमिनीच्या कारणावरून सतत वाद होत असे. त्या वादातून वैतागलेल्या अभिषेकने चुलत्याचा खून करण्याच्या उद्देशाने पुण्यातील एका मित्राच्या मदतीने पिस्टल आणले होते. त्या आणलेल्या पिस्टलमधून गोळी चालवण्याचा सराव दि. 30 रोजी तो घरात करत होता.त्याने पिस्टलमध्ये तीन गोळ्या असलेले मॅगझिन टाकले होत. त्याने ते मॅगझिन बाहेर काढले. मात्र पिस्टलच्या बॅरलमध्ये एक गोळी अडकल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने पिस्टलचा चाप ओढला. त्यादरम्यान समोर असलेल्या आईला गोळी लागून जबड्यातून आरपार गेली. त्याच्या आईला गंभीर दुखापत झाली असून, साताऱ्यात एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
आहेत. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात अभिषेक याच्याविरोधात अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या पथकाने अभिषेकला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने चुलत्याला मारण्यासाठी पुण्यातील मित्राच्या ओळखीने धुळे जिल्ह्यातून पिस्टल आणल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, संजय जाधव यांनी केली.