पिंपरी, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.5) सांगवीतील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शालेला भेट देत स्थलांतरित पूरग्रस्तांशी संवाद साधला.
या पाहणी दौर्यादरम्यान महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यानिमित्ताने एकत्र पहायला मिळाले.
चिंचवड विधानसभेवरून महायुतीमध्येच असलेली कमालीची तीव्र स्पर्धा पाहता, मुख्यमंत्र्यांचा दौरा महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकार्यांना एकत्रित आणण्यासाठी कारण ठरल्याचे पहायला मिळाले.
विद्यमान आमदार असलेला विधानसभा मतदार संघ संबंधित मित्र घटक पक्षाला सोडण्याचा राजकीय समझोता झालेला असतानादेखील चिंचवड विधानसभेवरून महायुतीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी व भाजपमधूनच या मतदार संघाचे आपण वारसदार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे.
याबाबतचा वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाणार असला, तरीदेखील या मतार संघातील इच्छूकांनी अतापासूनच या मतदार संगावर दावा ठोकायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे महायुतीमधील विशेषत: भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकार्यांमध्ये वितृष्ट आले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच या पक्षातील पदाधिकारी कार्यक्रमात एकत्र येण्याचे टाळत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरग्रस्तांच्या भेटीचा दौरा सांगवीतून सुरू केला. त्यामुळे यावेळी भाजपबरोबरच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी यानिमित्त एकत्र आल्याचे पहायला मिळाले.
मुख्यमंत्री शिंदे याठिकाणी असताना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काहींनी प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे पुढील दौर्याला रवाना होताच या पदाधिकार्यांनीदेखील याठिकणाहून काढता पाय घेतला.