मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावला होता. यामुळे मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. आता त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्या, मंगळवारी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास जाणवू लागला होता. यामुळे तीन दिवस ऍडमिट होण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर 12 नोव्हेंबरला त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
यानंतर तीन दिवस त्यांनी रुग्णालयातच विश्रांती घेतली आहे. आता ते घरी जाऊन आराम करू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री घरी परतण्याची शक्यता आहे.