नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील नवा मुख्यमंत्री कोण असणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. अशात नवनिर्वाचित आमदारांमधूनच मुख्यमंत्री निवड व्हावी, अशी भूमिका दिल्लीतील भाजपच्या काही नेत्यांनी घेतली आहे. तब्बल २६ वर्षांच्या खंडानंतर भाजपने दिल्ली जिंकली. विधानसभेच्या एकूण ७० पैकी ४८ जागा जिंकणारा भाजप सरकार स्थापनेसाठी सज्ज होत आहे. मुख्यमंत्री कोण बनणार ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे.
त्या पदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत आहेत. अशात भाजपच्या दिल्लीतील काही नेत्यांनी नवनिर्वाचित आमदारालाच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळावी असा सूर आळवण्यास सुरूवात केली आहे. जनादेशाचा आदर म्हणून नवनिर्वाचित आमदारांपैकीच एकाला मुख्यमंत्री बनवले जावे, अशी त्यांची भावना आहे.
काही वेळा खासदाराला मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्याचे पाऊल राजकीय पक्षांकडून उचलले जाते. त्या बाबीचा विचार करून संबंधित भाजप नेत्यांनी नवनिर्वाचित आमदारांमधूनच मुख्यमंत्री निवडण्याचा आग्रह धरला आहे. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून प्रवेश वर्मा, विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, आशिष सुद, पवन शर्मा, अभय वर्मा यांची नावे चर्चेत आहेत. महिला मुख्यमंत्र्याचा पर्याय स्वीकारला गेल्यास रेखा गुप्ता, शीखा राय यांच्या नावांचा विचार होऊ शकतो, अशी कुजबूजही भाजपच्या गोटात आहे.