पुरंदरच्या तहसीलदारांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना गळ

पुरंदरमध्ये गैरकारभार करणाऱ्यांकडून राजकीय डावपेच

वाघापूर – पुरंदरच्या तहसीलदार पदाची सूत्रे घेतल्यावर अगदी अल्प काळात प्रशासनावर अंकुश ठेवून निर्ढावलेल्यांना वठणीवर आणणारे आणि प्रशासन गतिमान करणारे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची बदली त्वरित करावी, यासाठी गैरकारभार करणाऱ्यांकडून राजकीय डावपेच आखत थेट मुख्यमंत्र्यांना गळ घातली जात आहे. मात्र, तहसीलदारांच्या कामाची पद्धती खुद्द मुख्यमंत्र्यांना चांगलीच माहित असल्याने मुख्यमंत्र्यांनी अशा विनवण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

पुरंदरच्या तहसीलदार पदाची सूत्रे अतुल म्हेत्रे यांनी हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच सगळे गैरप्रकार, कामकाजाची प्रक्रिया बदलली गेली. तहसीलदारांनी त्यांचा संपर्क नंबर खुला केल्याने एजंटांची गरजच राहिली नाही. एखादा कर्मचारी किंवा अधिकारी कामात ढिसाळपणा दाखवीत असेल तर सीसीटीव्ही यंत्रणेमुळे लगेच उघड होत आहे. खोटी कारणे सांगून कामात वेळकाढूपणा करण्याची पद्धत बंद झाली आहे. यातून गैरकारभार करणाऱ्यांचा बिमोड झाला आहे. सर्वसामान्य नागरिक स्वतः तहसीलदारांना सहज भेटत असल्याने कामात पारदर्शकता आली आहे. परंतु, तहसीलदारांच्या कामाची पद्धत ज्यांना खटकत आहे, अशांच्या ते रडावर आहेत. यामुळे त्यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे. याकरीता मुख्यमंत्र्यांना राजकीय हस्तकांद्वारे गळ घातली जात आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार म्हेत्रे यांच्या कामाची पद्धत माहित असल्याने राजकीय नेत्यांच्या विनंतीला त्यांनी धुडकावून लावले आहे, त्यामुळे आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे प्रयत्न काहींनी सुरू केले आहेत. तर, नागरिकांनीही आता प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

जनतेला सेवा आणि सुविधा देण्यासाठी शासनाने नियुक्ती केली आहे. जनतेचे हित आमच्याकरिता महत्त्वाचे आहे. यापुढेही जनतेच्या हिताच्या कामांनाच प्राधान्य देण्यात येईल, अशावेळी काही जणांना त्रास वाटत असतो, यातून बदली होत असेल तर आमची कोठेही बदलून जाण्याची तयारी असते.
– अतुल म्हेत्रे, तहसीलदार, पुरंदर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)