पुणे : 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद संकेतस्थळावर सादर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आशयाचे परीपत्रक क्र. 580 नुकतेच जारी करण्यात आले आहे.
लेखापरीक्षण केलेले ताळेबंद ऑनलाईन पद्धतीने धर्मादाय आयुक्तांचे संकेतस्थळावर अपलोड केल्यावर त्याची पोच मिळते. त्यानंतर ही पोच व या ताळेबंदांच्या प्रती स्थानिक धर्मादाय कार्यालयात दाखल कराव्या लागतात. त्या सोबत अनुसूची 9 ड नुसार सर्व विश्वस्तांचे पॅन क्रमांक देणे, गेल्यावर्षीपासून अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्यांबाबतचे सर्व स्त्रोत नमूद केलेले सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र जोडावे लागते. आयकर विभागानेही वार्षिक अहवाल दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती.
या ट्रस्टना आपले वार्षिक हिशोब पत्रकांचे सनदी लेखापालकांकडून लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. त्यांनी हे वाढीव मुदतीत सादर करवीत. या वाढीव मुदतीनंतर दाखल होणाऱ्या अहवालांना विलंबासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून दंड करण्यात येऊ शकतो. मात्र, जी मंडळे नोंदणीकृत नाहीत पण सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याच्या कलम 41-अ अन्वये लोकवर्गणी जमा करण्यासाठी तात्पुरता परवाना घेतात त्यांनी त्यांच्या विहीत मुदतीत जमाखर्च पत्रके सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचेवर कारवाई होऊ शकते.
याविषयी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन विश्वस्त ऍड. शिवराज प्र.कदम जहागिरदार म्हणाले,
कोविड 19 महामारीच्या उद्रेकामुळे अनेक संस्थांना लेखापरीक्षण करण्यास विलंब झाला. त्यामुळे ट्रस्टच्या विश्वस्तांना वार्षिक हिशोबपत्रके या वाढीव मुदतीत सादर करून दंडात्मक कारवाई टाळता येईल.