नवीन जिंदाल यांच्यावर आरोप निश्‍चित

नवी दिल्ली: उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह त्यांच्या कंपनीतील अन्य चौघाजणांच्या विरोधात दिल्ली न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. कोळसा साठ्यांच्या वाटपाबाबतच्या पडताळणी समितीला चुकीची माहिती दिल्याचा आरोप यासर्वांवर ठेवण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान करण्याच्या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली जिंदाल, जिंदाल स्टील ऍन्ड पॉवर लिमिटेडचे माजी संचालक सुशिल मरु, माजी उपमहाव्यवस्थापक आनंद गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गुजराल आणि कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता डी.एन. अब्रोय यांच्याविरोधात आरोप निश्‍चित केले.

मध्यप्रदेशातील उर्तान नॉर्थ कोळसा खाणींच्या वाटपाशी संबंधित खटल्यामध्ये आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळल्यानंतर न्यायालयाने हे आरोप निश्‍चित केले.

आरोपींनी पडताळणी समितीला जमिन आणि यंत्रसामुग्रीच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या असल्याचे खोटे दावे केले असल्याचे सकृतदर्शनी आढळते आहे, असे न्यायालयाने 1 जुलैच्या सुनावणीच्यावेळी म्हटले होते. झारखंडमधील अमरकोंडा मुरुगादंगल येथील कोळसा खाणीच्या अवैध वाटपाच्या एका अन्य प्रकरणी या प्रकरणी नवीन जिंदाल यांच्यासह माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा हे आरोपी आहेत. कोळसा खाणीचा ताबा मिळवण्यासाठी जिंदाल आणि अन्य आरोपींनी पडताळणी समितीकडे खोटे दावे केले आणि आपल्या कंपनीचा फायदा करून घेतला, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.