टीव्ही मालिकांमधील पात्रे

घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या टीव्ही मालिकांमधील पात्रे किती खरी असतात? किती आपली वाटतात? त्यातल्या किती घटना वास्तवाशी जुळणाऱ्या असतात?

माझ्या मते गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक टीव्ही मालिकांमधली पात्रे फार साचेबद्ध दाखवली जात आहेत. म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वीही मराठी मालिकेत दाखवली जाणारी स्त्री हातात भाजी निवडायचे ताट घेऊन बोलताना दाखवली जात असे. आजही ती तेच काम करीत बोलत असते. यातल्या स्त्रिया एक तर सरळमार्गी, भोळसट तरी असतात, किंवा कजाग आणि दुष्ट असतात. मधलंअधलं काही नसतंच त्यांच्यात. आई म्हटलं की, ती फक्त प्रेमळ आणि साधीभोळी दाखवली जाते.

टीव्हीतले पुरुष बहुतेक वेळा हातात वर्तमानपत्र किंवा लॅपटॉप घेऊन बसलेले असतात. खरं तर आता वृत्तपत्र वाचायचं सोडाच, ते पुरतं वाचून त्यावर चर्चा करणं, त्याविषयी लिहिणं हेसुद्धा आता स्त्रिया सर्रास करतात. अगदी अभ्यासपूर्ण, आर्थिक विषयावर, आंतरराष्ट्रीय संबंधांवरदेखील त्यांचे उत्तम लेख असतात. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया लॅपटॉप हाताळत आहेत. काळ इतका बदलला, पण टीव्हीतली माणसं काही बदलायला तयार नाहीत.

हल्ली अगदी खेडोपाडीसुद्धा बऱ्याचजणी वापरायला सुटसुटीत, पण अंगभर असा पंजाबी ड्रेस घालताना दिसतात. तालुका, शहर पातळीवर तर वयस्क स्त्रियाही हे ड्रेस घालताना दिसतात. टीव्ही सिरीयलमधल्या मुली मात्र शहरातल्या असोत की, खेड्यातल्या; सुशिक्षित असोत की अशिक्षित; लग्न होईपर्यंत छान वेगवेगळे ड्रेस घालत असतात. पण लग्न होताक्षणी सरसकट सगळ्यांना साड्यांमधे गुंडाळलं जातं. अगदी झोपतानासुद्धा त्या लफ्फेदार साड्या नेसून झोपतात. हे वास्तवापासून किती दूर जाणारं आहे! अशा पोषाखी मालिका आपल्याशा कशा काय वाटू शकतात?

मालिकेतल्या ऑफिसांमधलं वातावरण पाहून तर असं वाटतं की, ह्या लोकांनी कधी खरंखुरं ऑफिस पाहिलंय की नाही? “तू अशी जवळी राहा’ या मालिकेतला नायक राजवीर ऑफिसमधल्या लोकांना कायम हिडीसफिडीस करताना दिसतो. जरा काही झालं की, स्टाफमधील समोरच्या माणसाच्या अंगावर, “आऊट’ असं म्हणून खेकसत असतो. इतका अपमान कोण सहन करील? कामवाली, चपराशी किंवा वॉचमनसुद्धा आपण थोडा आवाज चढवला तर आपल्याला सुनावतात, “जास्तीचं बोलायचं काम नाही. नीट बोला… ‘. गंमत म्हणजे राजवीर जसा हाताखालच्या लोकांशी बोलतो, तसाच रुक्ष, एकसुरी, भावशून्य चेहऱ्याने घरीही बोलत असतो.

“वर्तुळ’ सारख्या मालिकांमधून स्त्रियांच्या छळाचे प्रकारही सविस्तरपणे बघायला मिळतात. या वरवर दिखाऊ, आधुनिक वाटणाऱ्या मालिकांना स्त्रीपुरुष समानतेचा तर पत्ताच नसतो. म्हणूनच “माझ्या नवऱ्याची बायको’ असे नाव असणारी मालिका जोरात चालते आणि “तुला पाहते रे’ मालिकेत दुप्पट वयाच्या पुरुषाशी मुलगी लग्न करते. हेच जर उलट असते तर? “माझ्या बायकोचा नवरा’ नाव असलेली मालिका चालेल? दुप्पट वयाच्या राहू दे, वयाने थोड्या मोठ्या असलेल्या नायिकेशी लग्न करणारा नायक मालिकेमधे दिसेल? अजिबात नाही. थोडक्‍यात, मालिकेतली पात्रे स्त्री आणि पुरुष यांची पारंपरिक प्रतिमाच अधिक ठळक करण्याचे काम करतात. नवीन विचारांचे त्यांना वावडे आहे. खरे तर मराठी साहित्य, नाटक प्रगल्भ आहे. मालिकांमधे मात्र तेच तेच विषय, त्याच त्याच ठोकळेबाज रीतीने मांडले जात आहेत. नवीन काळाचे प्रश्‍न, भावनांची गुंतागुंत हे गांभिर्यपूर्वक न दाखवता केवळ टाइमपास पद्धतीने बहुतेक मालिका तयार केल्या जात आहेत.

– माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.