बदलीच्या निर्णयाने झाला बदल

लहान मुले अगदी छोट्याशा गोष्टीनेही अस्वस्थ होताना दिसतात. त्यांचे मानसशास्त्र समजून घेत आपण वागलो, तर अनेक प्रश्‍न चुटकीसरशी सुटू शकतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सुभाषची आजी त्याला घेऊन भेटायला आली. आजी येऊन बसली तेव्हा तिला बराच दम लागला होता.
सुभाषचं वय अडीच वर्ष. त्यामुळे आजी त्याला कडेवर घेऊन आली होती. म्हणूनच तिला दम लागला होता. खुर्चीत बसल्यावर तिने सुभाषला खाली उतरवलं. आजीने त्याला खाली उतरवल्याबरोबर सुभाषने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. रडूनही आजी घेईना हे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके जोरात आपटले आणि लोळण घेतले. शेवटी न राहून आजीने त्याला परत उचलून घेतले.

त्याबरोबर सुभाषचे रडणे एकदम बंद झाले. तो रडायचा थांबल्यावर आजीने त्याला शेजारच्या खुर्चीवर बसवले तेव्हा मात्र तो रडला नाही. बघितलंत ना कसा करतो हा? घरीपण सारखं हेच चालू असतं. खात नाही, खेळत नाही सारखा रडत राहतो. याला एकतर कडेवर घ्यायचं नाहीतर खुर्ची किंवा स्टुलवरच बसवायचं. तरच हा शांत बसतो. मी आणि याचे आजोबा अगदी दमून जातो याला सांभाळणं खूप अवघड जातो हो आम्हाला. काय करू?

हे बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजीचं हे बोलणं ऐकल्यावर त्यांना सुभाषच्या आई-वडिलांबद्दल विचारलं. हा प्रश्‍न विचारल्यावर आजीला आणखीनच रडू आलं. थोडं शांत झाल्यावर त्यांनी कौटुंबिक माहिती द्यायला सुरुवात केली. 4-5 वर्षांपूर्वी सुभाषच्या आईचं म्हणजे सीमाचं लग्न झालं. सुरुवातीचं वर्ष चांगलं गेलं. पण नंतर सीमाच्या नवऱ्याचं वागणं बदलत गेलं. तो खूप विचित्र वागायला लागला. सीमाशी कधी खूप प्रेमाने वागायचं तर कधी खूप विक्षिप्त. दोन तीन वेळा तर त्याने तिच्यावर हातदेखील उगारला. या दरम्यानच्या काळात सीमाला दिवस गेले.

आतातरी नवऱ्याचं वागणं सुधारेल या आशेवर सीमा आणि घरातले होते. नवरा छान वागायला लागलाही पण हा बदल फार काळ टिकला नाही. सुभाषचा जन्म झाला आणि नवऱ्याने सीमाला घटस्फोट दिला. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यांचाही नाईलाज झाला.

यातून कसंबसं सावरून आई नोकरी करायला लागली. तिला नोकरी मिळाली आणि दोन महिन्यातच तिची परगावी बदली झाली. त्यामुळे सुभाषला त्याचे आजी-आजोबाच सांभाळतात. आई फक्‍त रविवारी येते आणि परत जाते. पण ती सुभाषला फारसा वेळ देत नाही. या धक्‍क्‍यातून ती कदाचित अजून सावरलीच नसावी असं आजीच्या बोलण्यावरून वाटत होतं. आजीच्या या बोलण्यातून सुभाषची समस्याही लक्षात आली होती. जन्मापासून ते आतापर्यंत सुभाषला आई-वडिलांचं प्रेमच मिळालं नव्हतं.

तो आजी-आजोबाबरोबरच होता. ते त्याला आजी आई-वडिलांचं प्रेम देऊ शकत नव्हती. शिवाय वयामुळे त्याला सांभाळण्यात त्यांना खूप मर्यादाही येत होत्या. त्याच्यामागे धावपळ करणं शक्‍य नसल्याने खुर्चीवर किंवा स्टुलवर बसण्याची सवय त्यांच्याकडूनच नकळत सुभाषला लागली होती.

त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांना सुभाषची समस्या लक्षात आणून दिली. आई-वडिलांपासून एवढ्या लहान वयात आलेला दुरावा आणि त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली भीती, असुरक्षितता, त्याच्या वयाला अपेक्षित असं वात्सल्य, मायेच्या स्पर्शाचा अभाव, परिस्थितीमुळे त्याच्या छोट्याशा जगावर झालेला मोठा आघात या सर्व कारणांमुळे त्याच्यामध्ये या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आजीला पुढच्यावेळी सीमाला घेऊन यायला सांगितलं. सीमा भेटायला आली. तेव्हा ती स्वतःच भावनिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ होती.

अपराधी भाव, राग, हताशपणा या भावनांच्या गुंत्यात अडकली होती. त्यामुळे पुढच्या दोन्ही सत्रात आधी सीमाला समुपदेशन करण्यात आलं. या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी तिला मानसिक बळ देण्यात आलं आणि मग सुभाषच्या समस्येची तिला जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर मात्र सीमाने सुचवलेले बदल अगदी मनापासून केले. प्रयत्नपूर्वक स्वतःची बदली आपल्याच गावात करून घेतली. साऱ्या बदलांमुळे सुभाषची प्रेमाची गरज भागली आणि त्याच्या या समस्या आपोआपच सुटत गेल्या.
(केसमधील नाव बदलले आहे.)

– मानसी चांदोरीकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.