सासवड, { अमोल बनकर} – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत प्रामुख्याने होणार असल्याचे चित्र स्पष्ट असले तरी महायुती व महाविकास आघाडीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने अनेक उमेदवारांची पुरंदरच्या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे.
त्यामुळे आघाडी, महायुतीत बिघाडी झाली तर पुरंदर-हवेलीत चौरंगी-पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता असून बंडखोरीचे आव्हान ही असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आम आदमी पार्टी असे घटक पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे घटक पक्ष एकत्र आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे सर्व पक्ष एकसंघ असताना देखील खासदार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली होती यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण आहे. तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार संजय जगताप तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून संभाजी झेंडे यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत. तर भाजपकडून माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना विजय शिवतारे यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा विविध विकासकामांच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असून त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठची असणार आहेत.
तर भाजपकडून पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी देखील आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळातून जनतेशी जवळी ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे नाव देखील सध्या जोरदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ठेवणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ दिगंबर दुर्गाडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर पुरंदर तालुक्यामध्ये नव्यानेच युवकांचा चेहरा म्हणून माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी देखील तयारी सुरू केली असल्याचे पाहावयास मिळते तर पुरंदर व हवेली मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये फ्लेक्सबाजीने झुरंगे यांनी चर्चेला उधाण आणले आहे.
विश्वासालाच यंदा आव्हान?
दत्ता झुरंगे हे सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादित केला. या नंतर ते पंचायत समिती सदस्य, नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र आता आमदार संजय जगताप यांच्या विरोधातच त्यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले असल्याचे पाहावयास मिळते.
गुंजवणीचा मुद्दा तापणार
विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने विरोधक व सत्ताधारी यांच्याकडून पुरंदरच्या भावनांना हात घालत गुंजवणीचा मुद्दा ऐरणीवर आणला जात आहे. गुंजवणीचे पाणी व विमानतळ आम्ही करणार असे सत्ताधारी व विरोधकांकडून सांगितले जात आहे.