चिंबळी, (वार्ताहर) – चिंबळी-मोई-कुरूळी परिसरात शेतकर्यांची रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्याने शेतमजूर टंचाई जाणवत आहे. नदी प्रदूषित झाल्याने कांदा लागवडीसाठी विहिरीच्या पाण्यावरच भिस्त असून यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने कांदा उत्पादन वाढवण्याची मोठे आव्हान शेतकर्यांना समोर आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला असून कांदा लागवड व त्यासाठीची मशागत याकडे अधिक लक्ष देत आहे.
शेतकरी जय कड म्हणाले की, कांदारोप तयार करत त्याचा वापर करून यंदाची रब्बी हंगामातील कांदा लागवड पूर्ण केली आहे. कांदा रोपाला देखील कमी पावसाचा फटका बसला असून रोपाचा तुटवडा भासल्याने कांदे लागवड रखडली असल्याचे चित्र होते.
शेतकरी वर्गानी खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, वाल, मूग, उदीड इतर पिकाची काढणी करून शेतीची मशागत करत शेतकर्यांनी रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड सुरू केली आहे. शेतकर्यांनी आपल्या शेतात कांदा लागवड सुरू केली असून चाकण, आळंदी येथील मजूर आणून कांदा लागवड करून घेतली जात आहे. मजूर टंचाईमुळे कांदा लागवड घटली असून शेतकरी वर्ग शेतात ज्वारी, बाजरी सारखी कमी पाण्यावरील पिके घेत असल्याचे देखील चित्र आहे.