पुणे – पहिल्यांदा करोना प्रतिबंधक लस 3 कोटी लोकांना देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानंतर 13 कोटी लोकांना लस देणार असल्याचे सांगितले. सर्वांना लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
विधानभवन येथे पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी लसीकरण करण्याचे जाहीर केले होते. सुरुवातीस त्यांनी 16 वर्षांवरील सर्वांना लस देणार असल्याचे सांगितले. सर्वांना लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकार ही जबाबदारी नक्की घेईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
पूजा चव्हाणप्रकरणी चौकशी सुरू
पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत पवार म्हणाले, “चौकशी पोलीस करतच असतात. आत्महत्या का केली, याची चौकशी केली जाईल. त्यामध्ये सत्य पुढे येईल, आता काही पक्षांना काहीही काम नसल्याने ते असे आरोप करतात. आरोपात तथ्य असेल, तर त्यात लक्ष घातले पाहिजे. पण, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी हे सर्व आरोप करतात. यापूर्वीही असेच आरोप करण्यात आले, मात्र चौकशीनंतर सत्य बाहेर आले.’