नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये गहू, जवस, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई रब्बी पिकांचा समावेश आहे.
काय असणार आहे नवीन भाव ?
यापूर्वी गव्हाचा एमएसपी 2,275 रुपये प्रति क्विंटल होता. तो आता 2,475 इतका झाला आहे. जवसाच्या एमएसपीमध्ये 130 रुपयांची वाढ असून आता दर 1,980 इतका झाला आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 210 रुपयांनी वाढवून 5,650 रुपये करण्यात आला आहे. मसूरचा एमएसपी 6,425 रुपये प्रति क्विंटल होता.आता मसूरचा नवीन एमएसपी 6,700 रुपये प्रति क्विंटल आहे.
मोहरी आणि तेलबियांचा जुना एमएसपी 5,650 रुपये होता. सरकारने त्यात 300 रुपयांची वाढ केली आहे. आता मोहरीचा नवीन एमएसपी 5,950 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्याच वेळी, करडईच्या एमएसपीमध्ये 140 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता करडईचा नवीन एमएसपी 5,940 रुपये इतका आहे.
एमएसपी म्हणजे काय? आणि ते का लागू केले जाते?
एमएसपी म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना मिळणारा हमी भाव होय. त्या पिकाचे भाव बाजारात कमी असले तरी. बाजारातील पिकांच्या किमतीतील चढ-उतारांचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये, असा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घोषित केलेल्या एमएसपीवरच एफसीआय शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत असते.
एमएसपीमध्ये किती पिकांचा समावेश आहे?
सध्या केंद्र सरकार 22 पिकांसाठी एमएसपी ठरवते. त्यात भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि जवस या 7 प्रकारच्या धान्यांचा समावेश आहे. हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर या 5 प्रकारच्या डाळींचा समावेश आहे. मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, नायजर या 7 तेलबियांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऊस, कापूस, आणि कच्चा ताग या 3 व्यावसायिक पिकांचा एमएसपीमध्ये समावेश आहे.