नवी दिल्ली -भारताच्या नकाशाचे चुकीचे सादरीकरण केल्यावरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत खडसावले. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व आदींविषयीचा अनादर बिल्कूल सहन केला जाणार नाही, असे सरकारने बजावले आहे.
ट्विटरच्या जिओटॅगिंग फिचरमध्ये लेहचे लोकेशन चीनमध्ये दाखवण्यात आले. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशातच ट्विटरने घोडचूक केल्याचे संतप्त पडसाद उमटले. सोशल मीडिया युजर्सनी ट्विटरवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारनेही त्याची गंभीर दखल घेतली. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयातील सचिव अजय सॉहनी यांनी भारताची तीव्र नापसंती व्यक्त करणारे पत्र ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना पाठवले. भारताशी संबंधित संवेदनशील बाबींचा आदर राखला जावा. लेह हे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय आहे. लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत. नकाशाच्या अयोग्य सादरीकरणासारख्या चुकीमुळे ट्विटरचीच बदनामी होईल. त्याशिवाय, ट्विटरच्या तटस्थतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.