चंदिगढ – पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांशी अखेर केंद्र सरकारने शनिवारी संपर्क साधला. सरकारकडून आंदोलकांना काही प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार करून आंदोलक पुढील निर्णय घेणार आहेत.
संबंधित सीमेवरील खनौरी आणि शंभू या दोन ठिकाणांवर शेतकरी विविध मागण्यांसाठी ११ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चेची तयारी असल्याचे वारंवार सूचित केले.
तसेच, सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याविषयी नाराजीही व्यक्त केली. अखेर शेतकरी आंदोलकांपर्यंत सरकार पोहचले असल्याची माहिती समोर आली. केंद्र सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी शेतकरी नेत्यांची भेट घेतली.
त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यावेळी सरकारकडून काही प्रस्ताव देण्यात आल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. मात्र, ते प्रस्ताव नेमके काय आहेत याची माहिती त्यांनी उघड केली नाही.
अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. डल्लेवाल यांनी आंदोलनस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला आठवडाभरात दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल.
उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नुकतेच १२१ शेतकऱ्यांनीही बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.