नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी येत्या 4 डिसेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून यावेळी पंतप्रधान दोन्ही सभागृहांच्या सभासदांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या ऑनलाईन बैठकीसाठी दोन्ही सभागृहाच्या नेत्यांना शुक्रवारी (४ डिसेंबर) सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. संसदीय कार्य मंत्रालयातर्फे सर्वपक्षीय बैठकीसाठी विविध पक्ष व नेत्यांशी संपर्क केला जात असल्याचंही समजतंय.
देशात कोरोना महासाथ आल्यानंतर केंद्र सरकारने करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेली ही दुसरी सर्वपक्षीय बैठक ठरेल. या बैठकीस मोदी सरकारमधील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे बडे नेते उपस्थिती लावतील अशी शक्यता आहे.
दिल्लीतील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन व अर्थसंकल्पीय अधिवेशन एकाच वेळी घेण्याच्या चर्चा सुरु असतानाच सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अहमदाबाद, हैदराबाद व पुणे येथील करोना लस निर्मिती करणाऱ्या संस्थांना भेट देत लस निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आल्याने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, करोना लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी भारतात करोना लसीचे उत्पादन सुरु असलेल्या अहमदाबाद, हैदराबाद व पुणे येथील संस्थान भेट दिली होती.