15 मे 2020 पासून सुरुवात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे – केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडून 2021 च्या जनगणनेसाठी 15 मे 2020 पासून सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यांत ही जनगणना असणार असून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या प्रभाग 1 ते 42 च्या सिमा या जनगणनेसाठी निर्धारीत केल्या असून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ही जनगणना केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून 2011 च्या जनगणनेचा आधार घेत शहरातील लोकसंख्येत 40 टक्के वाढ गृहीत धरली आहे. 2011 मध्ये शहराची लोकसंख्या 33 लाख 71 हजार होती. त्यात वाढ होऊन ती 2021 मध्ये 47 लाख 20 हजार 276 अपेक्षित धरली आहे. या आधारावर प्रत्येकी 600 लोकसंख्या व 150 कुटुंबांसाठी 1 प्रगणक निश्चित केला असून लोकसंख्या मोजणीसाठी 7,867 प्रगणक असणार आहेत. तर प्रत्येकी 6 प्रगणकांसाठी 1 पर्यवेक्षक निश्चित केला असून त्यांची संख्या 1,311 असणार आहे. अशा एकूण 9,178 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही जनगणना केली जाणार आहे.
1 मे ते 15 जूनदरम्यान पहिला टप्पा
महापालिकेकडून दोन टप्प्यांत ही लोकसंख्या मोजणी केली जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 जून 2020 या दीड महिन्याच्या कालावधीत प्रगणकांकडून घरांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधील प्रत्यक्ष घरांच्या ठिकाणी जाऊन लोकसंख्येची मोजणी करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार 1 मे 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत नियोजित वेळेत ही जनगणना महापालिका प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहे.