शिक्षण आयुक्‍त कार्यालयाला “सीसीटीव्ही’ची निगराणी

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर राहणार करडी नजर

पुणे – शिक्षण आयुक्त कार्यालयात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विविध संघटनांची आंदोलने, मोर्चे येतात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता नागरिकांवर व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण कार्यालयात “सीसीटीव्ही’ बसविण्यास सुरुवात झाली आहे.
सेंट्रल बिल्डिंगमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय अशी शालेय शिक्षणाबाबतची तीन महत्त्वाची कार्यालये आहेत. यातील प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात पूर्वीच “सीसीटीव्ही’ बसविण्यात आले आहेत.

शिक्षण आयुक्त कार्यालयातून प्रामुख्याने शालेय शिक्षणाबाबतची राज्यभरातील महत्त्वाची कामे चालतात. राज्यातल्या विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष, पालक संघ, शैक्षणिक संस्था आदींचे पदाधिकारी तसेच शिक्षक, मुख्याध्यापक हे कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त शिक्षण आयुक्त कार्यालयात सतत येत असतात. यामुळे दररोज दिवसभर हे कार्यालय गर्दीने गजबजलेलेच असते. शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक, प्रशासन अधिकारी, अधीक्षक आदींची कार्यालयेही याच आवारात आहेत. खालच्या स्तरावर कामे प्रलंबित पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक जण थेट शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडेच दाद मागण्यासाठी धाव घेतात.
शिक्षण आयुक्त कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे अडचणी जाणून घेतात. त्यावर सकारात्मक कारवाईच्या सूचनाही देतात.

बऱ्याचदा काही संघटनांना आक्रमक भूमिकाही घेताना आढळून येते. यामुळे कार्यालयातील प्रत्येक घडामोडीचे रेकॉर्डींग व छायाचित्र टिपण्यासाठी “सीसीटीव्ही’ बसविण्याचे नियोजन मागील काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. त्याची नुकतीच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाकडून ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्त कार्यालयात “सीसीटीव्ही’ बसविण्याचे काम मार्गी लागल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातही “सीसीटीव्ही’ बसविण्याची मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)