मंचर येथे कालव्यात कार कोसळली; जीवितहानी नाही

मंचर – चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मंचर -तपनेश्‍वर मंदिराजवळील उजव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात कोसळली. यामध्ये कारसह पाण्यात वाहत जात असलेल्या पाच जणांना कालव्यानजीक जनावरे धुवत असलेल्या शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता घडली.

मंचर शहरातील मोबाइल दुकानदार विनायक सदाशिव भोर हे घोडेगाव येथून कारमधून (एमएच 14 ईसी 2140) मंचरच्या दिशेने येत होते. कारमध्ये विनायक भोर, राजू झुंजाळ व अन्य तीन जण होते. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या रस्त्यावरुन मंचर बायपासजवळ विनायक भोर यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळली. त्यावेळी सुमारे 100 फुटांपेक्षा अधिक अंतरापर्यंत कार पाण्याबरोबर वाहत चालली होती.

कारमधील सर्वजण जीवाच्या आकांताने आरडाओरडा करीत होते. त्यावेळी कार कालव्याच्या पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून शेतकरी राजेंद्र बाणखेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीला ओंकार बाणखेले, साकीब इनामदार हे तरुण धावून आले. या सर्वांनी कारमधील पाचही जणांना पाण्याबाहेर सुरक्षित काढले. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या कुत्र्यालाही जीवदान दिले. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, आर. सी. हांडे, विठ्ठल वाघ, दादासाहेब जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. इनामदार क्रेन सर्व्हिसचे मालक बादशहा इनामदार यांनी घटनास्थळी क्रेन पाठवून कार सुरक्षितपणे बाहेर काढली. उजव्या कालव्यावरील रस्त्याला दुतर्फा कठडे नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी जोर धरीत अहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)