श्रीगोंदा – श्रीगोंदे-पारगाव फाटा रस्त्यावर गुरुवारी (दि.16) रात्री अकराच्या सुमारास कार रस्त्याच्या बाजूला उलटली. त्याचवेळी कारने पेट घेतला. रस्त्याने जाणाऱ्या संतोष बोळगे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहनचालक जावळे यांना गाडीबाहेर काढले. अन् काही क्षणात गाडीचा स्फोट झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी जावळे हे गुरुवारी (दि. 16) रात्री अकराच्या सुमारास आपल्या कारने श्रीगोंद्याहून नगरच्या दिशेने जात होते. पारगाव फाटा येथील वळणावर जावळे यांचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात जावळे जखमी झाले. याच दरम्यान कारच्या इंजिनने पेट घेतला. क्षणात आगीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
त्याच दरम्यान नगरहून श्रीगोंद्याच्या दिशेने जाणाऱ्या संतोष बोळगे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता, त्यात एक व्यक्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी धाडसाने कारचा दरवाजा उघडत जखमी जावळे यांना बाहेर काढत बाजूला घेऊन जात असतानाच गाडीचा स्फोट झाला.