कास मार्गावरील गणेश खिंडीत कार दरीत कोसळली

सातारा  -सातारा-कास मार्गावरील गणेश खिंडीत मारुती अल्टो कार (एमएच-12-जीएफ-0179) शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दरीत कोसळल्याने एका युवतीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा-कास रस्त्याने निघालेली मारुती अल्टो कार (एमएच-12-जीएफ-0179) पठाराच्या अलीकडे असलेल्या गणेश खिंडीतील मंदिराच्या मागील बाजूच्या शंभर फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील युवती बाहेर फेकली जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्याबरोबर असलेले दोन युवक कारबरोबर दरीत कोसळून गंभीर जखमी झाले आहेत.

त्यातील एक जण जखमी अवस्थेत दरीतून वर आला. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन उर्वरित जखमी युवकाला दरीतून वर काढले. दोन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि मृत युवती व जखमी युवकांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.