पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कर परिसरात दि. 6 आणि 7 जून रोजी पूर्णपणे लॉकडाऊन पाळला जाणार आहे. त्यानंतर पुणे महापालिकेच्या नियमांप्रमाणे कॅन्टोन्मेंटमध्येही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कन्टेन्मेंट झोन) वगळता अन्य परिसरातील दुकाने पी-वन, पी-टू या प्रमाणे, सम-विषम तारखांनुसार, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू होणार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजीत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत विशेष बैठक झाली. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी नोटीस प्रसिद्ध केली आहे. लॉकडाउनच्या काळात केवळ दूध विक्रीची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 आणि मेडिकल सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत खुली राहतील.
बोर्डाच्या निर्णयानुसार महात्मा गांधी रस्ता, जनरल थिमय्या मार्गाची एक बाजू (इस्ट स्ट्रीट), दस्तूर मेहेर रस्ता, वल्लभभाई पटेल स्ट्रीट (इस्ट स्ट्रीट), कोळसा गल्ली, एक्झिबिशन स्ट्रीट, ताबूत स्ट्रीट, बुट्टी स्ट्रीट, साचापीर स्ट्रीट, मोलेदिना रस्ता, कॉन्व्हेंट स्ट्रीट, सोलापूर रस्ता, घोरपडी बाजार रस्ता या रस्त्यांवरील दुकाने सुरू करण्यास सम-विषम नियमांप्रमाणे परवानगी दिली जाणार आहे. मात्र भीमपुरा, न्यू मोदीखाना, बच्चू अड्डा, घोरपडी व्हिलेज या कंटेन्मेंट भागामध्ये लॉकडाऊनचे नियम कायम राहतील.
सलून, मॉल, बाजारपेठा, होम डिलिव्हरी बंदच
बोर्डाच्या अनलॉकिंगच्या निर्णयामुळे या परिसरातील बहुतांश दुकाने, व्यापारी आस्थापन सोमवारपासून खुली होणार आहेत. मात्र सर्व सलून, मॉल, हॉटेल-रेस्टॉरंट, कुंभारबावडी, शिवाजी मार्केट, फॅशन स्ट्रीट, घोरपडी मार्केट या बाजारपेठा बंदच राहणार आहेत. तसेच हॉटेलमधून पार्सल नेण्यासाठी अथवा होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.