कराड उत्तरमध्ये शिवसेनेचाच उमेदवार

ना. नितीन बानुगडे-पाटील यांची माहिती
उंब्रज  –
हणबरवाडी, धनगरवाडी, इंदोली आणि पाल उपसा सिंचन योजनेवर शासनाने भरघोस निधी टाकला आहे. त्यामुळे काम रखडले जाणार नाही. हणबरवाडी-धनगरवाडी हा माझा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. शिवसेना कराड उत्तरमधील सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि या जागेवर शिवसेनेचा निष्ठावंत उमेदवार उभा राहील. कराड उत्तरमध्ये सेनेचा उमेदवार फक्त लढण्यासाठी उभारणार नाही तर जिंकण्यासाठी उभा राहील. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, असा ठाम विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानगुडे-पाटील यांनी उंब्रज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, उप जिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख सुनील पाटील, किरण भोसले यांची उपस्थिती होती. ना. बानुगडे-पाटील म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आलेली आहे. लोकांनी शिवसेनेला स्विकारले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघात मिळालेले जवळपास साडेचार लाख मतदान आणि कोल्हापूर, हातकणंगले येथे शिवसेनेच्या उमेदवारांचा झालेला विजय. हा पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे पाळेमुळे खोलवर जात असल्याचा परिणाम आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा जसा शिवसेनेचा होता तसा तो शिवसेनाच लढली. सातारा जिल्ह्यात जे विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. त्या जागेवर शिवसेना लढणार म्हणजे पाटण येथे तर शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु कराड उत्तर, फलटण, माण, कोरेगाव, वाई हे मतदारसंघ युती झाल्यापासून शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. त्या जागेवर शिवसेना पूर्ण ताकतीने निष्ठावंत शिवसैनिकासह लढणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही किंतु परंतु मनात न बाळगता विधानसभेच्या तयारीला लागा असा संदेश त्यांनी दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना जवळपास साडेचार लाख मते मिळाली. विजयासाठी थोडे फार मते कमी पडली. परंतु शिवसेनेने दिलेल्या लढतीचे उभ्या महाराष्ट्रात कौतुक होत आहे. या लढती वेळी आमच्या काही उणिवा राहिल्या. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण करणार असून त्या उणिवा पूर्ण करणार आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना सक्षम करणार असून येणारी विधानसभा निवडणूक ही युतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीला भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून सामोरे जाणार आहेत. कोणत्या मतदार संघामधून कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार याचा जागा वाटपाचा फॉर्मुला वरिष्ठ पातळीवरुन ठरला असून त्याबाबत पक्षश्रेष्ठी यांनी खुलासा केला असल्याचेही बानुगडे-पाटील यांनी यावेळी सांगीतले.

शनिवारी प्रकल्पग्रस्तांसाठी तक्रार निवारण परिषद

सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकरी यांची बैठक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता करमणूक केंद्र पाटबंधारे वसाहत कृष्णानगर सातारा येथे होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यात कृष्णा खोरे अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्प कालवे बांधकामे यांना अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन कामाची गुणवत्ता, तांत्रिक अडचणीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तरी सदर बैठकीस जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील प्रकल्पांशी संबंधित तक्रारी, मागण्या, निवेदने प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.