राज्यसभेच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक एनडीएसाठी ठरणार परीक्षा; पासवान यांच्या निधनामुळे जागा रिक्त

नवी दिल्ली -लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. ती जागा भरण्यासाठी 14 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. ती पोटनिवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दृष्टीने मोठीच परीक्षा ठरण्याची चिन्हे आहेत.

मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद विजयी झाले. त्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातून बिहारमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाची एक जागा रिक्त झाली. त्या जागेवर मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत पासवान यांनी विजय मिळवला. भाजपने ती जागा पासवान यांच्यासाठी सोडली होती. आता पासवान यांच्या निधनामुळे त्या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळी बिहारमधील सत्तारूढ एनडीएची समीकरणे बदलली आहेत.

बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. ती निवडणूक एनडीएमधून बाहेर पडलेल्या लोजपने स्वतंत्रपणे लढवली. पासवान यांचे पुत्र आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील नाराजीपोटी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपबरोबरचे नाते कायम असल्याचे संकेत ते देत राहिले.

आता लोजपचा समावेश नसणाऱ्या एनडीएने बिहारमध्ये पुन्हा सरकार स्थापन केले आहे. लोजपला पुन्हा एनडीएत स्थान द्यायचे की नाही ते भाजपने ठरवावे, अशी भूमिका घेत नितीश यांनी एकप्रकारे मित्रपक्षाच्या (भाजप) कोर्टात चेंडू ढकलला आहे. लोजपला पुन्हा एनडीएत सहभागी करून घेण्याला नितीश यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधी लोजपसाठी सोडलेल्या राज्यसभेच्या जागेबाबत एनडीए आणि विशेषत: भाजप काय निर्णय घेणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.