शेअर बाजारात खरेदीचे वातावरण कायम

टीसीएस, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंकेकडून त्याचे नेतृत्व

मुंबई – भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी कमालीची सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांकडून खरेदी चालू आहे. गुरुवारी शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर विराजमान झाले.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 514 अंकानी उसळुन 57,852 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 157 अंकांनी म्हणजे 0.92 टक्‍क्‍यानी उसळून 17,234 अंकावर बंद झाला.

टीसीएस कंपनीच्या शेअरचा भाव आज तीन टक्‍क्‍यांनी वाढला. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉक्‍टर रेड्डीज, कोटक बॅंक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. मात्र महिंद्रा, बजाज ऑटो, बजाज फिन्सर्व, एशियन पेंट्‌स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू आणि औषधी कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे आज निफ्टीने विक्रमी पातळी गाठली. सरकारी बॅंका आणि वाहन कंपन्या वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

काल वाहन कंपन्यांनी वाहन विक्री वाढल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र आगामी काळात वाहन कंपन्यांच्या उत्पादनावर सेमीकंडक्‍टरच्या तुटवड्यामुळे परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी वाहन कंपन्यांच्या शेअरकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काही दिवस मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील कंपन्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर या आठवड्यापासून गुंतवणूकदार आता या कंपन्याकडे आपला मोर्चा वळवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पहिल्या तिमाहीतील विकास दर 20 टक्‍क्‍यांच्या पुढे गेला आहे. जीएसटीचे संकलन वाढले आहे. रेल्वेची वाहतूक वाढली आहे. वाहन विक्री वाढली आहे. महागाई नियंत्रणात आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक आगामी काळातही वाढण्याची शक्‍यता बऱ्याच विश्‍लेषकांनी व्यक्त केली.

जागतिक बाजारातून आज कमी अधिक प्रमाणात सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर लवकर व्याज दरात वाढ होणार नाही असे फेडरल रिझर्व्हने सांगितले असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात काही प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.