पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरायची. पुन्हा कर्ज घ्यायचे. पुन्हा दुचाकी चोरायची, पुन्हा विकायची असा “बिझनेस’ करणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरलेल्या दुचाकींची विक्री चाेरट्याने दौंड तालुक्यात केल्याचे समोर आले आहे.
अरविंद चव्हाण ( वय ३९, रा. दौंड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरातून दुचाकी चोरली होती. या प्रकरणी तपासात पोलिसांनी परिसरातील सुमारे ८० सीसीटीव्हींचे चित्रीकरण तपासले.
दरम्यान, पोलीस कर्मचारी कल्याण बोराडे आणि शरद घोरपडे हे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी चव्हाणला पाहिले. त्याला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण, तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. अधिक चौकशीत त्याच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे आढळले.
चव्हाण हा पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये कामगार होता. घर चालवण्यासाठी तो अनेकांकडून दरवेळी चार-पाच हजार रु. उसने घेत होता. पैसे देणाऱ्यांनी तगादा लावल्यावर तो चोरीची बाइक स्वत:ची असल्याचे सांगत त्यांना विकायचा.
कर्जही फिटत होते, तसेच वरती काही पैसेही त्याला मिळत होते. तो दौंडहून लोकलने पुण्यात यायचा. आठड्यातून एखादी दुचाकी चोरुन गावाकडे जात होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार आदींच्या पथकाने केली.
… म्हणून फक्त जुन्या दुचाकींची चोरी
अरविंद चव्हाणकडे बनावट चावी होती. नव्या दुचाकींचे लॉक बनावट चावीने उघडत नाही. यामुळे तो २०१६-१७ पूर्वीच्या दुचाकी हेरायच्या. त्यांचे लॉक बनावट चावीने सहज उघडले जाते. यानंतर तो दुचाकी चोरुन पळ काढायचा.
काही दुचाकी त्याने ढकलत चावीवाल्याकडे नेल्या होत्या. चावी हरवल्याचे सांगत त्याने बनावट चावी बनवून दुचाकी गावी नेल्या, असे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांनी सांगितले.