प्रामाणिक व्यावसायिकांकडून मात्र नियमांची अंमलबजावणी
पिंपरी – करोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमधील अनेक निकष शिथिल करण्यात आले असले, तरीदेखील शहरातील हॉटेल्स व बिअरबारवरील निर्बंध कायम आहेत. मात्र, हे नियम धाब्यावर बसवत शहरातील बिअरबार व रेस्टॉरंटकडून हॉटेल बंद असल्याचे दाखवत आतमध्ये ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. याकरिता या बार व रेस्टॉरंटला राजकीय, प्रशासकीय व स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
शहरातील करोनाबाधितांचा आकडा 54 हजारांवर पोचला आहे. तर राज्यात अनलॉक -4 ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बिअरबार, रेस्टॉरंट व हॉटेल्स उघडपणे सुरु असल्याचे चित्र आहे. प्रवेशद्वाराजवळ हॉटेल बंद असल्याचा फलक लावून हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू असल्याचे भासविले जाते. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत शहराच्या विविध भागांमध्ये असलेल्या हॉटेल्सजवळून जाताना खाद्यपदार्थांचा खमंग वास ग्राहकांना आकर्षित करत आहे. दुसऱ्या दरवाजाने ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात आहे.
हॉटेलच्या बंद दरवाज्यामागे खाद्यप्रेमी मांसाहार व शाकाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. तर बिअरबारमध्ये मद्यप्रेमी अगदी बिनदिक्कतपणे मद्याचे घोट रिचविताना दिसत आहेत. हे सर्व करत असताना विशेषत: बिअरबारचा मालक अथवा मॅनेजर बिअरबारच्या आसपासच घुटमळत आतील ग्राहकांनी, तुम्ही सुरक्षित असल्याचा जणूकाही संदेशच देत आहे. तर टपऱ्या व हातगाडीवरूनही खाद्यपदार्थांची उघड्यावरच विक्री होत आहे.
शहराची खाद्यसंस्कृती विकसित करण्यात हातभार लावणाऱ्या दाक्षिणात्य हॉटेल व्यावसायिकांची बहुतांशी रेस्टॉरंटस् अद्यापही बंद आहेत; तर राजकीय, पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असलेल्या हॉटेल्स व बिअरबारमधून पोटावरून हात फिरवत, ढेकर देत असलेली मंडळी बाहेर पडतानाचे चित्र सर्रासपणे दिसत आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, वरदहस्तामुळे सुरु असलेले बिअरबार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे धाडस महापालिका प्रशासन तरी दाखविणार आहे की नाही? का नियम फक्त प्रामाणिक हॉटेल व्यावसायिकांसाठीच आहेत, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
याबाबत महाराष्ट्र क्रांती फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते हे पथारीचालकांचा व्यवसाय सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. तर पाच महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटले व्यवसायाची आर्थिक घडी सावरण्यासाठी निकष लागू करून शहर व परिसरातील सर्वच हॉटेल्स व रेस्टॉरंट खुली करावीत, अशी पिंपरी-चिंचवड हॉटेल्स असोसिएशनचे पद्मनाभ शेट्टी यांनी केली आहे.