पालखी मुक्कामासह विसावा तळ असुविधेच्या गर्तेत

आषाढी वारी : संत तुकाराम महाराज सोहळ्याचा देहू ते पंढरपूर मार्ग दुर्लक्षित
बोरगाव-माळखांबी रस्ताही अरुंद

सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव- माळखांबी अरूंद आहे. त्यामुळे पालखी मार्ग अपुरा पडतो. या जुन्या पालखी मार्गाने पालखी सोहळ्यातील वाहने जुन्या मार्गाने पाठविली जातात. या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था आहे. रस्त्याचे ठिकठिकाणी खडीकरण व मजबुतीकरण झाले आहे. तर काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होवू शकतो यासाठी या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी संस्थानकडून होत आहे.

 

उंडवडीची 15 एकर जागाही अविकसित

पालखी पुणे शहरातून पडल्यानंतर पंढरपूर वाटेवर बाहेर लोणी काळभोर, यवत, वरवंड या ठिकाणी मुक्‍कामी असते. या ठिकाणांच्या तळाचा अद्यापही पूर्ण म्हणजे हवा तसा विकास झालेला नाही. उंडवडी येथे शासनाने 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ती विकसित नाही. सणसर येथे तळाला आरक्षित केली आहे. परंतु ताब्यात नाही. त्यामुळे विकास ही करण्यात आलेला नाही. निमगाव केतकी येथे पालखी शाळेच्या आवारत मुक्कामी असते. तेथेही शासनाने पालखी तळासाठी जागा उपलब्ध करून देत तीचा विकास करण्यात यावा.

देहूगाव  – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा सोहळ्यातील पहिला मुक्‍काम, पालखी मार्गावरील विसावा तळ तसेच पालखी मार्गाचा उगम (देहू ते देहूरोड) विकासाच्या प्रतीक्षेत आहे. जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी 334 व्या पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहू येथील पंढरपूरकडे 24 जूनला मार्गस्थ होणार आहे. मात्र याच पालखी मार्गावर असणाऱ्या मुक्‍कामांच्या ठिकाणी वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांची व पालखी तळ विकासाची वानवाच असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, विश्‍वस्त पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, अजित मोरे यांनी दिली.

श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार वाड्यात पहिला पालखी मुक्काम होत असतो. हा वाडा जुना झालेला आहे. वाड्याचा दरवाजाही लहान आहे. या वाड्यात पालखी मुक्कामाला थांबल्यानंतर रात्रभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. दुसऱ्या दिवशी पालखी प्रशासकीय महापूजा, आरतीनंतर आकुर्डीकडे मार्गस्थ होत असताना सकाळी मोठी गर्दी उसळते. या गर्दीला थोपवणे, सांभाळताना पोलिसांची दमछाक होते. संत तुकाराम महाराज संस्थानने पहिला पालखी तळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विकसित करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार येथील वाड्यातील दिलीप गोसावी यांनी यासाठी पाठिंबाही दर्शविला आहे. वारंवार पाठपुरावा ही केला जात आहे; मात्र वाड्यातील आणखी एका हक्‍कदारांकडून अद्याप याला मान्यता मिळत नाही आणि त्याला दौंड तालुक्‍यातील मातब्बर नेते मंडळीचा पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात असल्याने हे प्रकरण पुन्हा “कुल’ होते, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

याशिवाय गावातील अन्य इमारतींची पाडपाड केल्यानंतर रुंदीकरण झाले. मग प्रत्यक्ष पालखी मुक्कामाचे ठिकाणच का विकसित करीत नाही, तसेच तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबर पालखी मार्गाचा विकास करण्याचे शासनाचे धोरण असताना तीर्थक्षेत्र देहूतून लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा देहू-देहूरोड या अरुंद पालखी मार्गावरून जात आहे. हे मार्ग सोहळ्याचा उगम मार्गच अद्याप विकसित नाही. हा मार्ग लष्कर हद्दीतून जात असल्याने लालफितीत अडकला आहे. हा मार्ग विकसित कधी होणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.

इंदापूर येथेही जागा अपुरी पडते. जुन्याच जागेत पालखी मुक्कामाला असते. इंदापूर ते सराटी, तोंडले बोंडले या जुन्या पालखी मार्गाचा अद्यापही वापर होते. तोंडले बोंडले येथे संत तुकोबा आणि संत माऊलीची अशा दोन्ही पालख्या एकत्र येतात. यावेळी वारीतील दिंड्या, वारकऱ्यासह भाविक मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या तीन चार वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही या भागातील मार्गाचे रुंदीकरण अथवा दुरूस्ती केली जात नाही. या रस्त्याची दुरूस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.