आयुर्मान संपलेल्या बसेस होणार ताफ्यातून बाद

पुणे – पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्याने जुन्या बसेसचा भरणा काढून टाकण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ताफ्यातील आयुर्मान संपलेल्या 255 गाड्या स्क्रॅप केल्या आहेत. तर, येत्या काही दिवसांत टप्याटप्याने जुन्या गाड्या स्क्रॅप करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पीएमपीएमएलच्या ताफ्यातील बहुतांश बसेस या आयुर्मान संपलेल्या असून मार्गावर चालविण्यास सक्षम नाहीत. परिणामी, अशा बसेस “स्क्रॅप’ करण्यात येतात. संचालक मंडळाने बसचे आयुष्य निश्‍चित केले आहे. त्यानुसार 12 वर्षे पूर्ण किंवा 8 लाख 40 हजार किलोमीटर धाव पूर्ण झाल्यानंतर या बसचे आयुष्य संपते. मात्र, ताफ्यातील अपुऱ्या बसेसमुळे आयुर्मान संपलेल्या बसही मार्गावर सोडल्या जातात. त्यामुळे आग, ब्रेकडाऊनसारख्या समस्यांत वाढ झाल्याचे दिसून येते. जानेवारी ते डिसेंबर 2018 पर्यंत 113 तर, जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंत 142 जुन्या बस स्क्रॅप केल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

पीएमपी बसच्या वेळेत बदल; प्रवाशांची गैरसोय
मागील काही दिवसांपासून मनपा-आळंदी मार्गावरील रात्रीच्या सुमारास असलेली पीएमपीच्या शेवटच्या बसची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आळंदी या ठिकाणी दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. तसेच, विद्यार्थी व नोकरवर्गही आळंदी परिसरातून शहरात येतो. मात्र, 12 ऑक्‍टोबरपासून मार्ग क्रमांक 119 मनपा ते आळंदी या मार्गावरील शेवटच्या बसची वेळ 11 वाजून 20 मिनिट ही बदलून 11 वाजून 5 मिनिटे केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, 10 वाजून 40 मिनिटांची गाडी रद्द केल्यामुळे खोळंबा होत आहे, त्यामुळे बसची वेळ पूर्ववत करण्याची मागणी, आळंदी शहर प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डी.डी. भोसले-पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.