अधिक रकमेच्या विम्याबाबत स्टेट बॅंकेचे स्पष्टीकरण
पुणे – ग्राहकांच्या बॅंकेतील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरविला जाणार आहे. यासाठी बॅंकेला अधिक प्रीमियम द्यावा लागणार असला तरी त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही, असे स्पष्टीकरण स्टेट बॅंकेने केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जावा अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने सर्व व्यावसायिक बॅंकांना दिल्या आहेत. या अगोदर एक लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी प्रति शंभर रुपये दहा पैशाचा प्रीमियम द्यावा लागत होता. आता बॅंकांना 12 पैसे प्रीमियम द्यावा लागणार आहे.
हा अतिरिक्त बोजा ग्राहकाकडे जाईल का, असे विचारले असता स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिष कुमार यांनी सांगितले की, या अगोदरही आम्ही तो बोजा ग्राहकांवर टाकत नव्हतो आणि आताही टाकणार नाही. आम्ही प्रीमियमसाठी तीन हजार कोटी रुपये देत होतो आता 3 हजार 600 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या रकमेत फारशी वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत बऱ्याच सहकारी बॅंकांची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे या बॅंकांतील ग्राहकांचे नुकसान झाले आहे. या कारणामुळे विम्याच्या ठेवीची रक्कम वाढविण्याचा निर्णय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू केली आहे. भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने हा निर्णय घेतला असला तरी इतर बॅंकांनी मात्र याबाबत आणखी परिस्थिती स्पष्ट केलेली नाही. छोट्या बॅंकांना हा अतिरिक्त प्रीमियम देणे परवडेल का याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.