लोणी काळभोर -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वडिलांच्या आजारपणाला कंटाळून दारूच्या नशेत मुलाने धारदार ब्लेडने त्यांचा गळा चिरला. यानंतर मृतदेह तीन दिवस घरातच ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
नईम रहीम शेख (वय 38, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन) या मुलाला अटक करण्यात आली आहे. रहिम गुलाब शेख (वय 67) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. तीन दिवसांनी दुर्गंधी सुटल्यावर आज घटना उघडकीस आली आहे.
दारुच्या नशेत लोहमार्गाच्या बाजूला झाडाखाली बिनधास्त झोपलेल्या नईमला अटक केल्यावर “उनको आजाद कर दिया’ असे तो पोलिसांना सांगत होता. रहीम शेख हे आपली मुलगी शहेनाज रशीदखान जमादार (रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन) यांच्याकडे राहत होते. नईम व त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते, त्यामुळे तोदेखील वडिलांसोबत बहिणीकडे राहत होता.
धक्कादायक बाब म्हणजे सात वर्षापूर्वी नईमने स्वतःच्या पत्नीवर ब्लेडने वार केले होते.
वडील रहिम शेख हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. औषधोपचाराला पैसे नसल्याने ते जागेवरच पडून होते. नुकतीच त्यांची करोना चाचणी केली होती. त्यामध्ये आज त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
8 जून रोजी खुनापूर्वी दुपारी मुलाचे व वडिलांचे किरकोळ भांडण झाले होते. मात्र करोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांच्या मुलाने ब्लेडने त्यांच्या मानेवर वार करून त्यांचा निर्घृण असा खून केला. मृतदेह 8 जूनपासून आज 10 जूनपर्यंत घरामध्ये दडपून ठेवून घरातील इतर सदस्यांसह सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवले होते; मात्र मृतदेह सडून दुर्गंधी पसरल्याने या खुनाची उकल झाली आहे.
आरोपीची बहीण शहेनाज रशीदखान जमादार हिने आपल्या भावाने वडिलांचा खून केल्याची व हे कोणाला सांगू नका नाही तर तुम्हालाही मारीन अशी दमदाटी केली असल्याची फिर्याद उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र येथे दिली आहे.