बैलगाड्याची आठवण स्मारकाद्वारे होतेय जतन

शर्यतीवर बंदी असली तरी संस्कृती, परंपरा जपण्याच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न

आळेफाटा – ग्रामीण भागाच्या संस्कृतीत रूजलेली परंपरा म्हणजेच बैलगाडा शर्यत. ही बैलगाडा शर्यत पाच वर्षांपूर्वी बंद झाली; मात्र बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मनात इतकी खोल रूजली आहे. बैलगाडा शर्यती बंद झाल्या तरी त्याची आठवण मात्र एका शेतकऱ्याने स्मारकाच्या रूपातून उभी केली असून हे स्मारक मात्र बैलगाडा मालकांना प्रेरणादायी ठरत आहे.

खरं तर बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागातल्या संस्कृतीची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली परंपरा आहे आणि हीच परंपरा ग्रामीण भागातील यात्रांचे खास आकर्षण असायचे; मात्र उच्च न्यायालयाने सन 2014मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आणि त्यानंतर बैलगाडा शर्यती बंद झाल्या.

या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले; मात्र या प्रयत्नांना अद्यापपर्यंत यश आले नाही. याबाबत अजूनही न्यायालयात ही बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बैलगाडा शर्यत सुरु होईल की नाही हे आजतरी सांगता येणार नाही; परंतु या बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांच्या मनात इतक्‍या खोलवर रुजल्या आहेत की, आज बैलगाडा शर्यत काळाच्या पडद्याआड जात असल्याची खंत बैलगाडा मालकांकडून व्यक्त केली जात आहे. आपल्या मुलांपेक्षाही बैलांना जीवापाड जपण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जातो. त्यामधूनच बैलगाड्यावर असलेले त्यांचे प्रेम अधोरेखीत होताना दिसत आहे.

वडिलांविषयी आदर
चाळकवाडी येथील शेतकरी कै. गणपत शंकर सोनवणे हे पण असेच एक बैलगाडा मालक त्यांचे बैलांवर आणि बैलगाडा शर्यतीवर प्रचंड प्रेम. सन 2014मध्ये बैलगाडा शर्यती बंद झाल्या आणि त्यानंतर सोनवणे यांचे निधन झाले. आपल्या वडीलांचे बैलगाडा शर्यतीवर असलेले प्रचंड प्रेम पाहून त्यांची मुले मकरंद आणि नितिन यांनी बैलगाडा शर्यतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुमारे एक ते दीड लाख रुपये खर्च करुन 15 ऑगस्ट 2015 रोजी घरासमोरच बैलगाडा शर्यतीचे स्मारक उभे करुन बैलगाडा शर्यतीची आठवण जोपासण्याचे काम केले आहे. आज हेच स्मारक बैलगाडा शर्यतींना प्रेरणादायी ठरत आहे

पाच वर्षांहून अधिक काळ बंदी उठण्याची शौकिनांना प्रतीक्षा

पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यातील मारवार जात व गाय बैलांमध्ये खिलार जात संपूर्ण देशात सर्वात सुंदर वा देखणी मानली जाते. विशेषत: यामुळेच या जातीच्या जनावरांच्या किमती काही लाखांत आहेत. खिलारचे मूळ कर्नाटकच्या हल्लीकरमध्ये सापडते. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांनी कर्नाटकातील संपगावात युद्ध मोहीम करुन तेथील 3000 बैल स्वराज्यात रायगडावर आणल्याची इतिहासात नोंद आहे. खिलारला अशी गौरवशाली परंपरा आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये प्रामुख्याने खिलार जातीचे बैल वापरले जातात त्यामुळे बैलगाडा शर्यतीमुळे या जातीचे खूप चांगल्या पद्धतीने संगोपन होते तसेच मागील पाच वर्षांपासून शर्यतीवर सततची बंदी असल्याने खिलारचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. शर्यतीवर बंदी असली तरी ग्रामीण संस्कृतीत लोकांच्या मनातून अजूनही ही शर्यत गेलेली नाही. म्हणून एका शेतकऱ्याने उभारलेले शर्यतीचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
-संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना पुणे

 

Leave A Reply

Your email address will not be published.