वॉशिंग्टन – चीनमधून उगम झालेल्या करोना व्हायरसचा जगभर प्रसार झाला आहे. जगातल्या सगळ्यांच देशात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र चीनचा शेजारी असलेल्या उत्तर कोरियात अजूनही करोनाची एकही केस सापडलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
उत्तर कोरिया एकतर लपवाछपवी करतो आहे किंवा ज्यांना लागण झाली आहे त्यांना ठार करण्यात आले असेल असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, द. कोरियात तैनात असलेल्या अमेरिकेच्या एका कमांडरने वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार करोनाचा प्रसार वेगाने होण्यास सुरुवात झाल्यावर चीनच्या सीमेवरून येणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेशच उत्तर कोरियाने दिले होते.
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर सर्व प्रकारचे निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे त्या देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. असे असूनही त्या देशात अद्याप अधिकृतपणे एकही करोना पॉझिटिव्ह सापडलेला नाही. ही बाब जगाला चकित करणारी आहे. मात्र, त्या देशाची सध्याची आरोग्य व्यवस्था पाहता तेथे जर करोनाचा शिरकाव झाला तर स्थिती कोणाकडूनही आटोक्यात येणार नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियाने जानेवारी महिन्यातच चीनच्या सोबतची आपली सीमा बंद केली होती. तसेच जुलै महिन्यात देशात अत्यंत कडक आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान, वॉशिंग्टन येथे सुरक्षाविषयक एका परिषदेत बोलताना अमेरिकेचे कमांडर रॉबर्ट अब्राम्स यांनी सांगितले की उत्तर कोरियाने चीनच्या सीमेलगत एक ते दोन किलोमीटरचा बफर झोनही तयार केला आहे. कोणतीही घुसखोरी होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. तसेच या भागात विशेष दल तैनात करण्यात आले असून चीनच्या बाजूने कोणीही येताना दिसला तर त्याला गोळ्या घालण्याचे आदेश या दलाला देण्यात आले आहेत.
अब्राम्स म्हणाले की, सीमा बंद झाल्यामुळे चीनमधून होणारी आयात 85 टक्के बंद झाली आहे. त्याशिवाय उत्तर कोरियाला अलीकडेच मायसाक वादळाचाही तडाखा झेलावा लागला. त्यात देशभरात दोन हजारपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. मात्र तरीही त्या देशाने करोनाचा शिरकाव होऊ न देण्यावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे.