अंदाजपत्रकावर महासभेत चर्चा नाही ः “करोना’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सभा रद्द
पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका अधिनियमानुसार दिनांक 31 मार्चपूर्वी महासभेकडून महापालिकेचे अंदाजपत्रक निश्चित होणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी अंदाजपत्रक निश्चितीला जगभर पसरलेल्या “करोना’ व्हायरसचा अडथळा आला आहे. प्रशासन करोना साथीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. तसेच “करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याची सर्वसाधाऱण सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे 2020-21 चे अंदाजपत्रक स्थायी समितीकडेच अडकले आहे. मार्चपूर्वी ते निश्चित होऊन महासभेकडे सादर होणे आणि ते निश्चित होणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या अधिकारात अंदाजपत्रक निश्चित करुन लागू करणार आहे.
मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निमित्ताने अंदाजपत्रक वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. नंतर अंदाजपत्रक निश्चित झाले तरी पावसाळ्यामध्ये अनेक कामे होऊ शकली नाहीत. आता यावेळी 2020-21 साठीच्या अंदाजपत्रकात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जुनी कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. तरीही मागील वर्षीपेक्षा 445 कोटींने जास्त तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनी 17 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी यांच्याकडे 6 हजार 628 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.
स्थायी समिती सभेत ते अंदाजपत्रक निश्चित होऊन दिनांक 30 मार्चपूर्वी ते महापौर माई ढोरे यांच्याकडे महासभेत सादर करणे आवश्यक होते. महासभेत त्यावर पुन्हा चर्चा होऊऩ ते अंतिम केले जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून “करोना’ने शहरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक महासभेकडे सादर होण्यासाठी एप्रिलची महासभा उजाडणार आहे. त्यानंतर पुन्हा महासभेतही अभ्यास व चर्चेसाठी किमान 15 दिवस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांच्या अधिकारात अंदाजपत्रक लागू केले जाणार आहे.
स्थायीत सुचविलेल्या नवीन कामांचा समावेश होणार का?
स्थायी समितीच्या 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत अंदाजपत्रकात अनेक नवीन कामे सुचविण्यात आली आहेत. स्थायी समिती सदस्यांच्या अभ्यासानंतर काही नवीन विकासकामे सुचविण्यात आली आहेत. त्यासाठीची तरतूद आयुक्तांनी सादर केलेल्या विकासकामांच्या तरतुदींमधून वर्ग करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नवीन कामे सुचविण्यात न आल्याने सदस्यांनी ही नवीन कामे सुचविली आहेत.
स्थायी सदस्यांनी सुचविलेली कामे
* जागतिक सात आश्चर्य प्रतिकृतीचे काम
* योगाच्या प्रसारासाठी अद्यावत भवन
* आधुनिक तंत्रज्ञानाचे सेव्हन डी थिअटर
* वाहतूक नियमांविषयी चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क
* पद्मविभूषण सुषमा स्वराज जनआरोग्य योजना
* स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तीन अभ्यासिका
* परमवीर चक्र विजेता पार्क