पुणे पालिकेची अंदाजपत्रकीय तूट 1,620 कोटींवर

शासनाच्या अनुदानावरच डोलारा : आर्थिक स्वयत्त्ता संपुष्टात

पुणे – महापालिकेच्या अंदाजपत्रकीय तुटीचा आकडा यंदाही 1,500 कोटींच्या वर गेला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात महापालिकेस सुमारे 4 हजार 250 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या आर्थिक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी 5 हजार 870 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. दरम्यान, महापालिकेस मिळालेल्या उत्पन्नातील सुमारे 55 टक्‍के रक्‍कम ही शासकीय अनुदानाची आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्वयत्त्ता जवळपास संपुष्टातच आल्याचे चित्र आकडेवारीवरून समोर येत आहे.

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेले बांधाकाम शुल्क आणि मिळकतकराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यातच, राज्य शासनाकडून 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला असून शासनाकडून महापालिकेस त्या बदल्यात अनुदान दिले जात आहे. मात्र, शासनाकडून पहिल्या वर्षी देण्यात आलेल्या अनुदानात 8 टक्‍के वाढ करणे आवश्‍यक असताना प्रत्यक्षात मात्र पालिकेचे अनुदान 4 टक्‍के कमी केले आहे. त्यामुळेही उत्पन्नावर परिणाम झाला असून इतर अपेक्षित उत्पन्न स्रोतांसाठी गेल्या वर्षभरात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेने अंदाजपत्रकात 5,870 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले असताना, प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या तिजोरीत 4,250 कोटींचा महसूल जमा झाला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. त्यातही सर्वाधिक सुमारे 1,847 कोटी रुपये एकट्या जीएसटी अनुदानाचे असून 1 हजार 95 कोटी मिळकतकर विभागाचे आहेत. 470 कोटी महापालिकेस मिळालेले शासकीय अनुदान आहे. तर बांधकाम विभागाकडून 704 कोटींचे उत्पन्न मिळालेले असून इतर उत्पन्नाच्या स्त्रोतातून अवघे 34 कोटींचे अनुदान मिळालेले असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

शासनाच्या अनुदानावरच कारभार
महापालिकेस 2018-19 मध्ये मिळालेल्या उत्पन्नाची स्थिती पाहता पालिकेचा आर्थिक डोलारा शासनाच्या अनुदानावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षात सुमारे 2,250 कोटी जीएसटी अनुदान व शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे अनुदान आहे. त्यामुळे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उत्पन्न अनुदानावरच असल्याने पालिकेची आर्थिक स्वयत्तता जवळपास संपुष्टात आलेली असल्याचे चित्र आहे. तर महापालिकेचे हक्‍काचे उत्पन्नाचे साधन असलेल्या मिळकतकर, तसेच बांधकाम विकसन शुल्कात गेल्या काही वर्षांत सातत्याने घट होत असल्याने या दोन्ही स्त्रोतांच्या माध्यमातून महापालिकेस मागील आर्थिक वर्षात सुमारे 1,800 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या एका वर्षाच्या वेतना एवढे आहे.

गेल्या तीन वर्षांतील उत्पन्नाची स्थिती
2016-17 : 3 हजार 728 कोटी
2017-18: 4 हजार 306 कोटी
2018-19: 4 हजार 250 कोटी

Leave A Reply

Your email address will not be published.