अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकाचा निर्घृण खून

कराड -अनैतिक संबंधांच्या संशयावरून रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव) यांच्या डोळ्यात चटणी टाकून आणि लाकडी दांडके व तलवारीने वार करून चौघांनी निर्घृण खून केल्याची घटना करवडी, ता. कराड गावच्या हद्दीत वाघेरी फाट्याजवळ शनिवारी (दि. 25) रात्री 10 च्या सुमारास घडली. 

या प्रकरणी दीपक शरद इंगळे, संदीप सुभाष इंगळे व दोन अनोळखी संशयितांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत नवनाथ रामचंद्र पवार (रा. आर्वी) यांनी फिर्याद नोंदवली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ व त्यांचे भाऊ रमेश हे आर्वी, ता. कोरेगाव येथे फिरून भाजीपाला विक्री व्यवसाय करत होते. त्या गावातील दीपक इंगळे याला आपल्या पत्नीचे रमेश पवारशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गेल्या 10-15 दिवसांपासून होता. त्यावरून दीपक व रमेश यांचा दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. रमेश हा शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गावातील लखन बालेखान मुलाणी यांच्या बोलेरो गाडीतून भाजीपाला आणायला कराड मार्केट येथे गेला. 

गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार हे रमेशसोबत होते. भाजीपाला खरेदी करून ते रात्री 10 च्या सुमारास आर्वीला परत निघाले. कराड-पुसेसावळी रस्त्यावर पाठीमागून आलेली तवेरा गाडी वाघेरी फाट्यानजीक बोलेरोला ओव्हरटेक करून पुढे आली. चालकाने बोलेरोला गाडी आडवी मारली.

 दीपक इंगळे, संदीप इंगळे व अनोळखी दोघांनी रमेशला गाडीतून बाहेर ओढले. पिशवीतून आणलेली मिरची पूड त्यांनी रमेशच्या डोळ्यात टाकली. दीपकने तवेरा गाडीतून तलवारीसारखे हत्यार काढून रमेशवर वार केले. संदीप व अन्य दोघांनी रमेशला दांडक्‍याने जबर मारहाण केली. त्यात रमेशचा मृत्यू झाला. खुनानंतर संशयित फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.