पुणे- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात कुऱ्हाड व दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना पंचशील नगर येरवडा याठिकाणी सोमवारी रात्री घडली. प्रतीक हनुमंत वन्नाळे (वय 28, रा. पंचशील नगर येरवडा) याचा या घटनेत खून झाला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचशील नगर येरवडा कॉमरझोन समोरील मोकळ्या मैदानात हत्यारे घेऊन भांडणे सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. घटनास्थळी दोन गटात झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाड व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गंभीर जखमी अवस्थेत प्रतिक याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या घटनेत प्रतीक याचा दुसऱ्या गटातील तिघांनी कुराड व दगडाने डोक्यावर वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. येरवडा पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
घटनास्थळी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी दाखल झाले असून अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झालं हे मात्र अद्याप समजू शकले नाही.