खळबळजनक ! राहुरीतील अपहृत पत्रकाराची निर्घृण हत्या; राजकीय नेत्यावर संशय

राहुरी विद्यापीठ – राहुरी शहरात एका साप्ताहिकात काम करत असलेले पत्रकार तथा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ता रोहिदास राधुजी दातीर (वय 49) यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या झाली आहे. दातीर यांच्या पत्नी सविता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी भर दुपारी राहुरीत मल्हारवाडी रस्त्यावर एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्यांनी त्यांचे अपहरण केले होते. घटना घडल्यानंतर तत्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळविण्याचे प्रयत्न करत तपासाला दिशा दिली. एका राजकीय पक्षाचा वांबोरी येथील कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्यानेच दातीर यांचे अपहरण केल्याचा संशय आहे.

दातीर यांच्या पत्नी सविता यांनीही तसा आरोप केल्याने पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचाही मोबाईल बंदच होता. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले ते वाहन पोलिसांनी हस्तगत केले आहे. ते वाहनही एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुपारी अपहरण झालेल्या दातीर यांचा रात्री उशिरा राहुरीतील कॉलेज रोड परिसरात मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी (दि. 6) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी रोडने आपल्या राहुरीतील घराकडे दुचाकीवरून जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या लोकांनी अगोदर दातीर यांच्याशी चर्चा केली. नंतर त्यांना मारहाण करतच वाहनात उचलून टाकले आणि त्यांना घेऊन निघून गेले होते. ज्यावेळी दातीर यांना वाहनात टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यावेळी दातीर मदतीसाठी ओरडत होते, असेही सांगितले जात आहे.

दातीर यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. घटनास्थळी दातीर यांची दुचाकी आणि पायातील चप्पल पडलेली होती. त्यावेळी दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद होता. त्यामुळे दातीर यांचा मोबाईल अपहरणकर्त्यांनी बंद केला की मोबाईलची बॅटरी संपली? हे अजून उघड झालेले नाही. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते वाहन ताब्यात घेतले. मात्र, आरोपींविषयी अजून काहीच धागेदोरे मिळालेले नाहीत.

राजकीय नेत्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल, अशा एका प्रकरणाची दातीर यांनी माहिती आधिकार माहिती मिळविलेली होती. त्यातूनच दातीर यांची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्‍त केला जात आहे. दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही अनेकदा दातीर यांच्यावर हल्ला झाला होता. ते राहुरी तालुक्‍यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष होते.

नियमबाह्य बांधकाम, अतिक्रमणाबाबत पाठपुरावा
राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, नियमबाह्य बांधकामे, स्टेशनरोड परिसरातील एक 18 एकरचा प्लॉट, नगर-मनमाड रोडवरील एका हॉटेलची नियमबाह्य इमारत, यासह अनेक विषयांचा दातीर यांनी पाठपुरावा केला होता. त्याचाही हत्येशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

चार संशयीत ताब्यात
पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान चार संशयिताना ताब्यात घेतले. तसेच या घटनेत आता खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेतील आरोपी जवळपास निश्‍चित झाले असून, लवकरच सर्व आरोपी गजांआड करण्यात येतील अशी माहिती उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.