नरजातीचा बिबट्या जेरबंद : मादीचा पिंजऱ्याला गुंगारा
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील कण्हेरी-काटेवाडी ढेकळवाडी आणि पिंपळी लिमटेक या भागात मागील महिन्याभरापासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर कण्हेरीत लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. 30) पहाटे नर जातीचा बिबट्या अडकला असला तरी मादीने पिंजऱ्याला गुंगारा दिल्याने परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण असून या मादीलाही जेरबंद करून तालुक्याला बिबट्याच्या दशहतीतून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरीत आहे. दरम्यान, जेरबंद बिबट्याची पोलीस बंदोबस्तात भुगाव येथील रेस्क्यू सेंटर येथे रवानगी केली असल्याची माहिती बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी त्र्यंबक जराड यांनी दिली.
बारामती तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत बिबट्याने जनावरे ठार केल्याने या गावातील ग्रामस्थांनी या बिबट्याची धास्ती घेतली होती गेल्या आठ दिवसापासून आम्ही काटेवाडी आणि कन्हेरी परिसरात सहा ट्रॅप कॅमेरे आणि तीन पिंजरे लावले होते. तर गुरुवारी पहाटे कण्हेरी भागातील संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्याचे रेस्क्यू टीमचे अभिजित महाले व बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी त्र्यंबक जराड यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत होता. बिबट्या हा सातत्याने उसाच्या शेतामध्ये लपून बसत होता, त्यामुळे ऊसतोड मजूर देखील ऊस तोडण्यास धजावत नव्हते. आज अखेर पहाटे जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला, यामुळे वनविभाग आणि रेस्क्यू टीमचे अभिनंदन करतो त्यांनी अथक परिश्रम घेऊन या बिबट्याला जेरबंद केले आहे.
– सुधीर पानसरे, ग्रामस्थ, कण्हेरी
22 फाटा येथे बछडे नसून तरसाची पिल्ले
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील 22 फाटा या ठिकाणी असलेल्या पोपट बुरुंगले या शेतकऱ्यांच्या उसामध्ये तीन बिबट्यांची बछडे गेल्याचे बुधवारी (दि. 29) साहिल शेळके या तरुणाने सांगितले होते. तर संबंधित ठिकाणी वनविभागाने त्वरीत धाव घेत पाहणी केली असता कोणताही प्राणी आढळून आला नव्हता. मात्र, वनविभागाने त्या प्राण्याच्या पायांचे ठसे गोळा केले होते. मात्र, हे आढळलेले पायांचे ठसे हे बिबट्याच्या बछड्याचे नसून तरसाच्या पिल्लांचे असल्याचे प्रथामिक अहवालात नमूद केल्याचे वनविभागने स्पष्ट केले.