कनौज (यूपी) – लग्नसमारंभाचा विधी सुरू असतानाच अचानक वधूचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेश राज्यातील कन्नोज येथे घडली आहे. यानंतर लग्न विधी अर्धवट सोडावी लागली. त्यामुळे वराला वधूशिवाय खाली हात माघारी फिरावे लागले. आनंदात दुःखदायक घटना घडल्यामुळे वरातीत शोककळा पसरली.
ताठिया पोलीस हद्दीतील भगतपुरा या गावात ही धक्कादायक घटना घडली. नवरदेव वरातीसह थाटामटात लग्नमंडपात पोहोचला. थोड्या वेळात वधूचे आगमन झाले. लग्न सुरळीत सुरू होते. वधू लग्न विधी सुरू असतानाच 19 वर्षीय वनिता नावाची वधू एकाएकी लग्नमंडपात चक्कर येऊन खाली कोसळली.
तिला तिच्या घरच्यांनी आणि नवरदेवाच्या घरच्यांनी तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिची करोना चाचणी करण्यात आली असून ती करोना निगेटिव्ह आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळेल.