पॅलेस्टाईन – काही दिवसांपूर्वी पंजाबमधून एक वृत्त आलं होतं. यानुसार येथील एका इसमाने भीतीपोटी कोरोनाबाधेमुळे मृत्यू पावलेल्या आपल्या सख्ख्या आईवर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला होता. या घटनेमुळे एका अदृश्य विषाणूपुढे आपली रक्ताची नातीही कमकुवत ठरतायेत काय? असा प्रश्न उपस्थित झालेला. मात्र पॅलेस्टाईन येथील एका मुलाची कृती या प्रश्नाला छेद देणारी ठरली आहे.
त्याचं झालं असं की, पॅलेस्टाईन येथील बीट आव प्रदेशात राहणाऱ्या जिहाद अल-सुवैती या इसमाच्या वृद्ध आईला कोरोना विषाणूची बाधा झाली. आधीच इतर आजारांनी ग्रासलेल्या ७३ वर्षीय रस्मी सुवेती यांना कोरोना उपचारांसाठी हेब्रोन स्टेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात कोरोना उपचार सुरु असल्याने जिहाद अल-सुवैती यांना आपल्या आईला भेटता येत नव्हते. मात्र आईला पाहण्याची ओढ लागल्याने त्यांनी एक मोठं पाऊल उचललं.
अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या आईला पाहण्यासाठी जिहाद अल-सुवैती हे रुग्णालय इमारतीच्या भिंतीवर चढून अतिदक्षता विभागाच्या खिडकीजवळील निमुळत्या कट्ट्यावर बसायचे. येथून ते मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या आईला एकटक पाहत असत. आईवर उपचार सुरु असताना ते रोज रात्री याच मार्गाने आपल्या आईचे दर्शन घ्यायचे.
मात्र इतर आजारांनी ग्रासलेल्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. आपल्या मातृप्रेमात आकंठ बुडालेल्या या पुत्राला आपल्या आईची शेवटची भेट घेता यावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने जिहाद अल-सुवैती यांना आई रस्मी सुवेती यांना भेटण्याची परवानगी दिली. अखेर आपल्या मुलाला पाहिल्यानंतर त्या आईनं काही वेळातच आपला जीव सोडला.