सासवड (प्रतिनिधी) –पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबातील मुलगा करोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील मुलाचा शासकीय रुग्णालयातील करोना तपासणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
(दि.19) रोजी मुंबईहून कोडीत येथे एक कुटुंब राहावयास आले होते. या कुटुंबाला गावात आल्यापासूनच प्रशासनाने जिल्हा परिषदेत शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. या कुटुंबामध्ये आई, वडील, मुलगा, दोन नाती, आजी-आजोबा असा परिवार होता. हा संपूर्ण परिवार आणि तेथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते.
कुटुंबातील मुलाला त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला सासवड येथील ट्रिपल सी सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्याचे स्वॅब नमुने हे तपासणीकरिता पाठवण्यात आले असता त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. आता पुरंदर तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही तीनवर पोहचली आहे.
याअगोदर वीर, सुपे याठिकाणी प्रत्येकी आढळले एक रूग्ण आढळले होते. आता यात कोडीत गावाने भर घातली आहे. प्रशासनाच्या वतीने दिल्या जात असलेल्या सर्व सूचना, नियम, कायद्यांचे पालन करा. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा सुविधाकरिता घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.