सातारा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. सध्या अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आणि याच वेळी त्यांनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट घेतली. सध्या त्यांच्या या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केलं. ‘अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं’, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तसेच, या भेटीदरम्यान छत्रपती घराणे आणि ठाकरे कुटुंबायांतील ऋणानुबंध अनुभवता आला तसंच विविध विषयांवर दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली, असल्याचं देखील उदयनराजे यांनी सांगितलं.
सध्या अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आणि यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली आहे. तसेच, यावेळी अमित ठाकरे यांनीही आपले मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असे होऊ शकत नाही. त्यामुळे राजे आहेत का विचारलं आणि भेटलो. ही राजकीय भेट नव्हती. ही सदिच्छा भेट होती’. असं ते म्हणाले.