काबुल : अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून अशर्रफ घनी यांचा शपथविधी सुरू असतानाच दोन बॉम्बस्फोट झाले आणि गोळीबाराचे आवाजही आले.
त्यामुळे उपस्थित समुदायामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तसेच सुरक्षा रक्षक आणि नागरिकांमध्ये काही काळ धावपळ झाली. सुदैवाने या बॉम्बस्फोटांमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही, असे नंतर स्पष्ट करण्यात आले.
शपथविधी दरम्यान नागरिकांना उद्देशून घनी भाषण करत असतानाच ही घटना घडली. मात्र हे बॉम्बस्फोट किंवा गोळीबाराच्या आवाजांनंतरही घनी यांनी मंच सोडून दिला नाही आणि आपले भाषण पुढे तसेच सुरू ठेवले.
घनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला या दोघांनी एकाचवेळी अध्यक्षपदाची शपथ घेतली. घनी यांना जरी अधिकृतपणे निवडणूकीत विजयी म्हणून घोषित केले गेले असले, तरी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही स्वतःच विजयी झाल्याचा दावा केला होता.
अध्यक्षांच्या राजवाड्याच्या प्रांगणातच हे दोन्ही शपथविधीचे समारंभ एकाच वेळी सुरू होते. त्याच वेळी हे बॉम्बस्फोट झाले, त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांसाठी उपस्थित झालेल्या नागरिकांची पळापळ झाली.