स्पुटनिक लसीची निर्मिती करणार
मुंबई – डॉ. रेड्डीज् लॅबोरॅटरी कंपनीसंदर्भात दोन महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यामुळे शुक्रवारी कंपनीच्या शेअरच्या भावात जवळजवळ 10 टक्क्यांनी वाढ झाली.
कॅन्सरच्या औषध निर्मिती संदर्भात या कंपनीने ब्रिस्टल मेयर स्क्वेब या कंपनीबरोबर तडजोड यशस्वी केली आहे. यासंदर्भातील वृत्त आल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. डॉ. रेड्डीज् रशियन विकसित स्पुटनिक लसीचे उत्पादन करून ही लस वितरित करणार आहे. या दोन घडामोडींमुळे गेल्या चार दिवसांपासून या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 134 अंकांनी म्हणजे 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 38,845 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 11 अंकांनी कमी होऊन 11,504 वर बंद झाला. एचडीएफसी बॅंकेसंदर्भात अमेरिकेत खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे बॅंकेचा शेअर 2 टक्क्यांनी कमी झाला. बॅंका वित्तीय संस्था आणि ग्राहकवस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठी घट झाली. मात्र, औषधी क्षेत्राने निर्देशांकांना आधार दिला.