मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा निषेध करण्यासाठी बॉलीवूडची मंडळीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरूवारी पाहावयास मिळाले. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या निदर्शनांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शक लक्षणीय संख्येने सहभागी झाले.
मुंबईतील निदर्शनांत प्रामुख्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले. निदर्शक म्हणून बॉलीवूडच्या मंडळींनी लावलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली. फरहान अख्तर, अनुराग कश्यप, राकेश ओमप्रकाश मेहरा, अनुभव सिन्हा, कबीर खान, जावेद जाफरी, सुशांत सिंह, स्वरा भास्कर, आदिती राव हैदरी या दिग्दर्शक-कलाकारांनी निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला.
वादग्रस्त ठरलेल्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने बॉलीवूडची मंडळी पुढे येत आहे. मात्र, त्यांनी भूमिका मांडण्यासाठी सोशल मीडियाला पसंती दिली होती. मात्र, आता थेट रस्त्यावर उतरण्याचे पाऊलही त्यांनी उचलले आहे.