मायणी : मायणी ता. खटाव गावातून जाणार्या चांद नदी पात्राजवळच्या बंधाऱ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आढळलेला मृतदेह हा पुरुषाचा असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, येथील चांद नदीपात्रात देशमुख वस्ती व शिंदेवाडी रोड दरम्यानच्या बंधाऱ्यात सोमवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. सोमवारी सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना नदी पात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याचे दिसले.
त्यानंतर अजिंक्य दूध संघाचे चेअरमन हिम्मत देशमुख यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, फौजदार शहाजी गोसावी, मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी व पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. दरम्यान मृतदेहाची अजून ओळख पटली नसल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.