माया आटली! करोना बाधित मुलाचा मृतदेह रुग्णालयातच सोडून जन्मदाते फरार

जम्मू – करोना विषाणूची दुसरी लाट देशामध्ये हाहाकार माजवत आहे. या लाटेत दररोज सापडणाऱ्या  बाधितांसोबतच मृतांचे प्रमाणही वाढले असून यांमुळे हॉस्पिटल्स व  स्मशानभूमीबाहेर राग लागल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. 

एकीकडे आपल्या नातेवाईकांसाठी बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन सिलिंडरची जमवाजमव करताना नागरिकांची होणारी धावपळ आपण पहिली. तर दुसरीकडे करोनाच्या भीतीपोटी जन्मदात्यांवर अंत्यसंस्कार नाकारण्याच्या घटनाही आपण पाहिल्या. अशीच एक हृदयद्रावक घटना जम्मू येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन महिन्याच्या एका बालकाला काल (सोमवारी) सकाळी हृदयाशीनिगडित व्याधींमुळे जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान बालकाचा मृत्यू झाला.

रुग्णालयाने बालकाची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत रुग्णालय प्रशासनाने पालकांना कळवले व त्यांनीही चाचणी करून घ्यावी असं सांगितलं. मृत बालकाच्या पालकांनीही चाचणी करण्यास होकार दर्शवला. मात्र यानंतर ते रुग्णालयातून पसार झाले.

महाराज गुलाब सिंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुलाब सिंग यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘पालकांनी रुग्णलयातून पलायन केल्याने बालकाचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात पडून आहे. बालकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.’

दरम्यान, मुलाच्या पालकांचा शोध सध्या स्थानिक पोलिसांमार्फत घेतला जातोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.