पिंपरी(प्रतिनिधी) – पवना नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे उघडकीस आली.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदी पात्रात चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलास पाचारण करून महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला.
या महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष आहे. तिने अंगात हिरव्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज असा वेष परिधान केला आहे. मयत महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.